संजय राठोडांची पोहरादेवीला येण्याची वेळ ठरली; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पोहरादेवी मंदिराच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात, बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल
वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड याठिकाणी येतील, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.
संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे: संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.
पोहरादेवी संस्थानला पोलिसांची नोटीस
संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.
तब्बल 15 दिवसांनंतर राठोड येणार सर्वांसमोर
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अज्ञातवासात होते. त्यांचा नेमका पत्ता कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर राठोड यांचे कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत. ते मंगळवारी पोहरा गडावर जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, राठोड यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आनेक चर्चांना उधाण आले आहे. आता मंगळवारी पोहरादेवी गडावर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा
पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड मंगळवारीच पोहरादेवी येथे सर्वांसमोर येणार आहेत. राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा आहे. मात्र पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला एक नोटीस बजावली. ज्यात फक्त 50 लोकांनाच कार्यक्रमावेळी हजर राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे पोहरादेवीत राठोड आपली भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करतात आणि नोटीस बजावल्याप्रमाणे फक्त 50 जण उपस्थित राहतात, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे लोक गर्दी करणार, हे राठोड आल्यावरच कळणार आहे.
महंत दुपारी साधणार संवाद
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर संजय राठोड समर्थक मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल करत आहेत. त्यामुळं पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बजावलेली नोटीस बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मिळाली आहे.
बाबूसिंग महाराज उपस्थित राहणार
बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र महाराज कर्नाटकमध्ये असून ते उद्या पोहरादेवी येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.