मुंबई : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतो. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे घोषित केले आहे. तेव्हापासून हा लढा सुरू आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिले होते. पण आता हे काम होईल”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोध केला आहे. नाव बदलणे हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच दिला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारले. तुम्ही असे कसे बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असेच विरोध करतो म्हणाले. आता असेच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असे सांगितले”, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
मुंबई सेंट्रलचे नाव बदलण्यासाठी केंद्राची कार्यवाही
मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारने कार्यवाही सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. तसे पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवले आहे. त्यावर “गेल्या 6 वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना पत्र लिहून त्यात राज्य सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे सांगितले होते. केंद्राकडून प्राथमिक मान्यता मिळायला हवी होती ती मिळाली नसल्याचे त्यांना पत्राद्वारे सांगितले होते. त्यावर मंगळवारी राज्यमंत्र्यांनी पत्र पाठवून प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे. आता आपण वाट पाहत आहोत. फेब्रुवारीत जयंतीपूर्वी मंजुरी मिळावी”, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.