बार्शीत तीव्र आंदोलन, विश्व हिंदू परिषद मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आक्रमक

राज्य सरकारला विश्व हिंदू परिषदेने सर्व मंदिरे खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

0

सोलापूर :  राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं. मुंबईत मुंबादेवी परिसरात आंदोलन केले.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बार्शीजवळच्या पानगाव शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस अडवली आणि त्या बसवर मंदिरे खुली करण्याची मागणी करणारा फलक लावला. यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत बसचे टायर जाळले. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या दुसऱ्या बसेसमधून बार्शीकडे रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाशांसह परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे विभागीय मंत्री सतीश आरगडे पाटील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले. पुण्यात मंडईतील शारदा गणपती मंदिरासमोर शंख, ढोल यांचा नाद करत आंदोलन करण्यात आले. येत्या दसऱ्याला सरकारने जर मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. “इतर राज्यातील मंदिरं खुली झाली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरे उघडली नाहीत. राज्यात दारुचे दुकानं सुरु झाले. पण मंदिरे उघडली नाहीत”, अशी टीका आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. “महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे-मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. त्यामुळे किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा”, असे आंदोलक म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.