चौकशी रियाची, फटका कोल्हापूरच्या तरुणाला; फोन नंबरच्या साधर्म्यामुळे घोळ
रियाच्या नंबरशी साधर्म्य असलेला फक्त, एक अंक बदललेला नंबर सागर सुर्वे यांचा
कोल्हापूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांची चौकशी सुरू झाली. यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीही चौकशी खूप सखोल होताना दिसत आहे. तिचे कॉल रेकॉर्डिंग काढले जाते, परंतु याचाच फटका कोल्हापुरातील एका सर्वसामान्य तरुणाला बसला.
काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून नंबर दाखवला. रियाच्या नंबरशी साधर्म्य असलेला पण केवळ एक अंक बदल असलेला नंबर सागर सुर्वे नावाच्या तरुणाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सागरला सतत कॉल आणि व्हॉट्सअॅप मेसेज येत आहेत. रियाशी बोलायचे आहे…तुझे फोटो पाठव…काही अश्लील मेसेजदेखील येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला सागरला काही समजले नाही. पण एका वाहिनीवर दाखवलेला रियाचा नंबर आणि सागरच्या नंबरमध्ये शेवटी एका अंकाचा फरक असल्याचे लक्षात आले. शेकडो कॉल आणि मेसेज येण्यास सुरुवात झाली. नंबर ब्लॉक केले. पण व्हॉट्सअॅपला मेसेज, व्हिडीओ कॉल येऊ लागले. शेवटी सागर सुर्वे यांना त्यांचा नंबर ब्लॉक करावा लागला. सागर सुर्वे सरकारी नोकरीत आहेत. कामाच्या ठिकाणीही फोन येणे सुरुच होते. कित्येकदा तणावाखाली जाऊन सागर यांनी फोन स्वीच ऑफ केला. पण फोन सुरू होताच पुन्हा बेल वाजायची. शेवटी सागर यांनी काल (10 ऑगस्ट) तो नंबर कायमचा बंद करून टाकला. सरकारी नोकरीत असल्याने सागर सुर्वे यांचा नंबर सर्व ठिकाणी देण्यात आला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास करताना झालेल्या चौकशीचा सागर सुर्वे यांना फटका बसला. पण आता हा नंबर बंद ठेवल्याने काम करतानाही सागर यांना अडचणी येत आहेत.