भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही करा चौकशी, अंजली दमानियांची न्यायालयात मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे

0

पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे एसीबीने भूखंड घोटाळ्यात कोणाची चौकशी करणे आवश्यक आहे, याची यादीच सरोदेंनी न्यायालयात दिली. भूखंड घोटाळा प्रकरणी आता कोणाची चौकशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन कागदपत्रे आणि व्यवहार प्रक्रिया तपासली जाणार असून यावर 23 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसेंना नोटीस

भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. एकनाथ खडसेंनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली होती. ईडीची नोटीस आल्याचे एकनाथ खडसेंनी मान्य केले होते. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ईडीने त्यांना 14 दिवसांनंतर हजर राहण्याची मुभा दिली होती.

एकनाथ खडसेंची भूमिका

“माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,” असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले होते.

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

“जर मी ती जमीन खरेदी केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी कसा दोषी? एखाद्या उताऱ्यामध्ये इतर हक्कात कोणाचे नाव असेल, तर तो मालक नाही होऊ शकत. इतकी तर समज माजी मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) असायला पाहिजे. त्यांना वाटत असेल, तर माझी ना नाही. पण मला समजवू तरी द्या” असे आर्जव खडसेंनी केले. एमआयडीसी जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ आली, असा दावा फडणवीसांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
“एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असे खडसे म्हणाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.