जितेंद्र आव्हाड यांच्यावर मीरा-भाईंदरची जबाबदारी ‘राष्ट्रवादी’ची पक्षबांधणी सुरू

पुन्हा भक्कमपणे पाय रोवून पक्ष जोमाने उभा करू” आव्हाडांनी शरद पवार यांना दिला शब्द

0

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये संपुष्टात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा तयार करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर सोपवली. त्याकरिता मीरा रोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मीरा भाईंदर समन्वयक आनंद परांजपे, मीरा भाईंदर निरीक्षण संतोष धुवाळी आणि प्रमोद सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“मीरा भाईंदर शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पक्षाकडे चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने चांगली संघटना बांधली होती. पण ज्यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी टाकली होती, त्यांनी पळून जाण्याची भूमिका घेतली. मीरा भाईंदरमध्ये पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी आता माझ्याकडे दिली आहे. आपण पदाधिकारी-कार्यकर्ते मिळून एवढे चांगले काम करू की, येथे पक्ष पहिला जसा भरभक्कमपणे पाय रोवून उभा होता, त्याचपद्धतीने आतादेखील पक्ष जोमाने उभा करू”, असे आव्हाड म्हणाले. “जे कोणी गेले असतील त्यांना जाऊ द्या. जे राहिले त्यांच्यावर प्रामाणिकतेने विश्वास ठेवून आता आपल्याला पुढची लढाई लढायची आहे”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना जागवली. तसेच यापुढच्या काळामध्ये मीरा भाईंदरमध्ये पक्षसंघटना बळकटीचे काम पदाधिकारी-कार्यकर्त्यांना जोमाने करायचे असल्याची सूचना केली. “आमच्या एका कार्यकर्त्याचे हॉटेल होते. त्या हॉटेलला अनधिकृत म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी तीन वेळा जाऊन तोडले. मी 124 अनधिकृत हॉटेल्सची यादी जाहीर करतो. जर आयुक्तांमध्ये हिमत असेल तर 124 अनधिकृत हॉटेल्स पाडून दाखवावीत”, असे आव्हान आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना दिले. “आयुक्त कोणाला तरी खूश करण्यासाठी काम करत असतील तर गाठ आमच्याशी आहे. येथे बसलेले अधिकारी काय करतात?, कोण किती भ्रष्टाचारी आहे?, याची यादी आम्ही खिशात घेऊन फिरतो”, असे म्हणत भाजपची सत्ता असलेल्या मीरा भाईंदर स्थानिक सत्ताधाऱ्यांवर आव्हाडांनी बोचरे वार केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.