चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी, अजित पवारांनी घेतली दखल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले हे अतिशय चुकीचे

0

पुणे : “ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे,” असे म्हणत कोल्हापुरातील खानापूर गावातील नव्या राजकीय समीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला. ते पिंपरी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना खानापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेची साथ सोडली हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत तेथील स्थानिकांना वरिष्ठांनी सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

खानापुरात शिवसेना एकाकी

कोल्हापुरातील खानापूर गावात आघाडीत बिघाडी झाल्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. हे गाव खुद्द चंद्रकांत पाटलांचे असल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आघाडीची राज्यात चर्चा होऊ लागल्यामुळे थेट वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या खानापुरातील निवडणुकीची दखल घ्यावी लागली आहे. या निवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, “येथे झालेली आघाडी ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही तेथील लोकांना वरिष्ठांकडून सूचना दिल्या आहेत,” असे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे झाले त्याचे समर्थन कुणीही करणार नाही, असेसुद्धा त्यांनी म्हणाले.

कधीकाळी अशक्य मानले जाणारे राजकीय समीकरण प्रत्यक्षात येऊन राज्य पातळीवर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी स्थापन झाली. हे त्रिकूट आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. असे असले तरी दुसरीकडे महाविकास आघाडी आपला राज्यकारभार व्यवस्थितपणे हाकत असल्याचे सांगितले जाते. राज्यात पाच महत्त्वाच्या शहरांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्येही एकदिलाने लढण्यासाठी या पक्षांकडून चाचपणी होत आहे. असे असले तरी सध्या राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे उदयास येत आहेत. खानापुरात आघाडीत बिघाडी झाल्यानंतर अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सूचना दिल्याचे सांगितले. मात्र, सध्यातरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपशी युती केलेली असून येथे शिवसेना हा पक्ष एकटा पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे खानापुरातील स्थानिकांना सूचना दिल्यानंतर आता य़ेथे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.