बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

निवडणूक जिंकल्यावर अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्रातून नका पडू बाहेर

0

पाटणा : बिहारमध्ये महागठबंधनचीच सत्ता येईल, आणखी थोडा वेळ वाट पाहा, असा छातीठोक दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज झा यांनी केला आहे. आम्ही जे बोललोय ते खरे करून दाखवू. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मनोज झा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

महागठबंधनच्या सर्व उमेदवारांनी  जिंकल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच केंद्रातून बाहेर निघावे. अन्यथा नंतर काहीही घडू शकते. मतमोजणी संथपणे का सुरु आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मात्र, महागठबंधनचा विजय निश्चित आहे, असे मनोज झा यांनी सांगितले. आज सकाळीच मनोज झा यांनी महागठबंधन बिहारची निवडणूक एकतर्फी जिंकेल, असा दावा केला होता. बिहारमध्ये अटीतटीची लढत होत नाही, येथील जनता एकतर्फीच निकाल देते, असे झा यांनी म्हटले होते. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांनंतर महागठबंधनकडे असणारी आघाडी कमी होत गेली. त्यामुळे नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार, या आशेने जदयूच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मतमोजणीचा वेग कमालीचा संथ असल्याचे दिसून आले. अखेर यावर निवडणूक आयोगाला पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. यंदा कोरोनामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 20 टक्केच मतमोजणी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे निराशेचे वातावरण पसरलेल्या महागठबंधनच्या गोटातील आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज झा यांनी आता पुन्हा एकदा ‘राजद’च्या विजयाचा दावा करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी काही तासांनंतर निकालाचे चित्र वेगळे असेल, असा दावा केला जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.