बिहारमध्येही चालला इम्तियाज करिष्मा, खैरे ठरले प्रभावहीन

एमआयएम पक्षाचे 5 उमेदवार विजयी, शिवसेना उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

0

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष होते, पण औरंगाबादकरांना उत्सुकता होती दोन स्टार प्रचारकांच्या कामगिरीची. त्यापैकी एक म्हणजे औरंगाबादचे विद्यमान खासदार, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील अन‌् दुसरे शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे. औरंगाबादेत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या रणधुमाळीत आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी धडाकेबाज प्रचार केला. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे येथेही इम्तियाज यांच्या पदरी यश आले अन‌् खैरेंच्या पदरी पडले मात्र अपयश.
इम्तियाज यांनी २० ठिकाणी सभा, रॅली घेतल्या. त्यापैकी त्यांचे पाच उमेदवार विजयी झाले. खैरे यांनी २२ मतदारसंघांत सभा घेतल्या. पण त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. इतकेच काय तर शिवसेनेच्या २१ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली. राज्यातील वंचित बहुजन आघाडीनेही बिहारमध्ये उमेदवार दिले होते, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. शिवसेनेच्या सेवा, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीचा नितीशकुमार यांनीही वापर केला. गुंडाराज नको म्हणत बिहारमधील मध्यमवर्गाने तर दारूबंदीच्या मुद्द्यावर महिलांनी ‘एनडीए’ला कौल दिल्याचे दिसते. रोजगाराच्या मुद्द्यावर तरुणांनी तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मतदान केल्याचे दिसते. जातीय गणितांमुळे आम्हाला यश मिळू शकले नाही, असे बिहारमध्ये खैरेंसोबत प्रचारात सहभागी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू ओक म्हणाले.
पक्षाध्यक्ष ओवेसी, मी आणि महाराष्ट्र-हैदराबादेतील नेते, कार्यकर्ते दहा दिवस बिहारमध्ये तळ ठोकून होतो. काँग्रेसने फक्त भाजपला विजयी करण्यासाठी उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने केलेल्या मतविभागणीचा फटका ‘एमआयएम’च्या किमान दहा उमेदवारांना बसला. तरीही एकूण निकाल आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहेत, असे एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.