‘दवाखाना चालवायचा तर हफ्ता दे’, माजी सरपंचाने मागितली डॉक्टरकडे खंडणी
लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी देऊ', माजी सरपंचाची डॉक्टरला धमकी
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता.शिरूर) येथील डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर यांच्याकडे गावात दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, असे म्हणून पैसे मागणाऱ्या शिक्रापुरचा माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता.शिरूर) येथील डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर ( वय 28), राहणार माळीमळा, शिक्रापूर तालुका शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. 24 तारखेला शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून, ‘तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला मी दवाखाना चालवू देणार नाही. गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू’, असा दम दिला. ‘गावामध्ये फक्त माझेच राज्य आहे’, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली याबाबत रामेश्वर बंडगर यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर गुन्हयाचा तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा, पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर हे करीत आहेत. अशा प्रकारे आणखी कुणाला खंडणीची मागणी होत असल्यास लोकांनी निर्भयपणे शिक्रापुरः पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.