मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा घेतला असता राजीनामा : प्रकाश आंबेडकर

“मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा''

0

नागपूर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या 26 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता देशातील शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारनेही पाठिंबा दिला. त्याचबरोबर राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

“मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. “महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारदेखील का कायदा करत नाही? अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचे? असे सांगितले जाते. दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा तयार केला नाही”, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.“भाजप घटनाबाह्य वागत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, हे तीन पक्षदेखील घटनाबाह्य वागत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.“आरएसएस, भाजप यांची मांडणी पूर्णपणे हुकमशाह पद्धतीची आहे. हे दिल्लीच्या आंदोलनावरून दिसून येते. शेतकरी थंडीत बसले आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही कायदा केला तुम्ही मान्य करा, अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि पाठिंबा देतो. हे तीन कायदे आल्यानंतर सरकारी खरेदी संपली असेल”, असे आंबेडकर म्हणाले. “सरकार खरेदी करणार नाही. मग फूड सिक्युरिटीचे काय होणार? फूड सिक्युरिटी द्यायची नाही, अशी सरकारची भूमिका दिसते. शासन खरेदी करणार नसेल तर नागरिकांना सबसिडीचे अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण होणार आहे”, असे मत त्यांनी मांडले.

वंचित ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणार

“आज पूर्व विदर्भातील अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल कसे करायचे यावर मंथन झाले. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने आमचे उमेदवार असतील. आम्ही ग्रामपंचायत ताकतीने लढणार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याचबरोबर “ग्रामपंचायतमध्ये ओबीसी संदर्भात लॉटरी सिस्टम लावण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करायची आहे”, असेदेखील त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.