‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर ‘मातोश्री’वरही दिवाळी नाही’- नवनीत राणा

दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 50 हजार रुपये मदत

0

अमरावती : काही दिवसांपूर्वी राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अमरावती जिल्ह्यालाही बसला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असेल तर ‘मातोश्री’वरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मध्य रस्ते, पिकांचे झालेले नुकसान, विजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरे या सर्व बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती. मंगळवारी नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर  बोंडअळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी. जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.