‘मला पवार साहेबांबाबत तसे बोलायचे नव्हते, पण…’

महाविकास आघाडीसाठी भाजपचे कडवे आव्हान असून सर्वच पक्षांची जोरदार तयारी

0

पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचे कडवे आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचे नव्हते,” अशा शब्दांत पाटील यांनी सारवासारव केली आहे. टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.