आपला पगार किती, आपण बोलता किती, भाजपच्या आमदारांचा संजय राऊतांना टोमणा

गोपीचंद पडळकर यांचा 'फेकू' म्हणून उल्लेख. या टीकेला प्रत्युत्तरासाठी संजय राऊतांना रोखठोक पत्र

0

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरममरीत पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांचा ‘फेकू’ म्हणून उल्लेख केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी गोपीचंद यांनी संजय राऊत यांना रोखठोक पत्र लिहिले आहे.

आपला पगार किती, आपण बोलता किती, असा टोमणा देखील गोपीचंद पडळकर यांनी पत्रातून संजय राऊत यांना मारला आहे.आमदार गोपीनाथ पडळकर यांनी संजय राऊत यांनी पत्रात लिहिले की, संजय राऊत साहेब, मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा, असे उद्बोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख ‘फेकूचंद पडळकर’ असा केला आहे. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आई-वडिलांनी दिला. आपण ‘सामना’च्या अग्रलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले आहे की, महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर
फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत, असा त्याचा उद्देश. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुख-दुःखाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दुःखी धनगर समाजाचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही, ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या ‘सामना’कडून दुसरी अपेक्षाही काय करणार, असा खोचक टोला लगावला आहे. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळे लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे याचा अंदाज तरी कसा येणार, असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला.

राज्याच्या प्रतिष्ठेवर दारूची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारूची दुकाने उघडून मंदिर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचे अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचे प्रदर्शन मांडायचे हे कसले स्त्रीदाक्षिण्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत तुम्ही आपले राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणानारळाने ओटी भरून यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का तेही महाविकास आघाडीत जाऊन विसरले, असा प्रश्न पडळकर यांनी केला. संजय राऊतजी, आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? ऊठसुठ  कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला ‘मातोश्री’तून मिळाले की बारामतीच्या ‘गोविंदबागे’तून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या. शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी मी काही विधाने केली तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकही आहे, कारण आपल्या निष्ठा ‘मातोश्री’ पेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता, आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असे राहून राहून वाटते, अशी गोपीचंद पडळकर यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.