कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह? उस्मानाबादेत 48 तर बीडमध्ये 25

शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण

0

मुंबई : येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या.
राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात राज्यातील तब्बल 115 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी इतके शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उस्मानाबादमध्ये 48 शिक्षकांना कोरोनाची लागण : राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 9 वी ते 12 पर्यंतच्या 491 शाळा असून त्यात 4 हजार 593 शिक्षक आहेत. त्यापैकी 3 हजार 786 शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 3 हजार 702 शिक्षक कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

बीड 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी :राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पहिल्या एक हजार चाचणीत 25 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज उर्वरित शिक्षकांची कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

सिंधुदुर्ग, नांदेड आणि कोल्हापुरातील शिक्षकही कोरोनाबाधित :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे आठही शिक्षक माध्यमिक वर्गातून शिकवणारे शिक्षक आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी ख़बरदारीचा उपाय म्हणून संबंधित शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

नांदेडमधील आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नांदेडमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 19 हजार 841 इतकी झाली आहे. तर कोल्हापुरातील 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षकांना कोरोना?

बीड – 25
उस्मानाबाद – 48
सिंधुदुर्ग – 8
नांदेड – 8
कोल्हापूर – 17
औरंगाबाद – 9

औरंगाबादेत 1393 शिक्षकांची कोरोना चाचणी : औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यात काल 1393 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत तब्बल 8 शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळला आहे.  दरम्यान अजून जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्या सुरु आहे. त्यामुळे जर बधितांचा आकडा वाढला तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे.

नागपुरात शाळांमध्ये सॅनिटायझेशनचे काम : येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार काही शहरांमध्ये अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
मात्र नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. शाळा सुरू करताना कोविडच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नागपूर शहरातील शाळांमध्ये सध्या सॅनिटायझेशनचे काम वेगाने सुरू आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूंचं निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. त्याशिवाय एकूण 11 हजार 500 शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.