शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?; मनसेचा सवाल
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने केली टीका
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने टीका केली आहे.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचे बोलले जात आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.
फडणवीसांचे आरोप
या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वाझेंवर काही आरोप केले होते. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकेच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमले आहे. हे आश्चर्यकारक आहे, असे फडणवीस म्हणाले होते. हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि इतर कोणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे त्यांना चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमले. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचे या गाडी मालकाशी संभाषण झाले होते, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
कोण आहेत वाझे?
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्यांनी काम केले. वाझेंनी एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.