बीडमध्ये घडली ‘सैराट’ घटना, बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करून केली हत्या
बीड शहरात ‘सैराट’ चित्रपटासारखी थरारक घडना घडली आहे. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीचा काटा काढला. त्याने मेहूण्याचा भररस्त्यात निर्घूण खून केला.
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या गेटवर ही घटना घडली. इंजिनिअरिंगची परिक्षा देऊन घरी जात असताना सुमित वाघमारे आणि त्याची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर दुचाकीवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्र संकेत वाग यांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात सुमितचा जागीत मृत्यू झाला व भाग्यश्रीही जखमी झाली. भाग्यश्रीने पतीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र भावाने तिचा एकही शब्द ऐकला नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी ती मदतीची याचना करत होती. मात्र तिला कुणीच मदत केली नाही.
मुळचा तालखेड (ता. माजलगाव) सुमित हा बीडमध्ये मावशीकडे शिक्षणासाठी राहत होता. दोन महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने पळून जाऊन लग्न केले. मात्र या लग्नाचा भाग्यश्रीच्या घरातून विरोध होता. यावरून बालाजी आणि सुमित यांच्यात आगोदरही वाद झाले होते. याचाच राग मनात असलेल्या बालाजीने सुमितला जीवे मारले. बालाजी आणि संकेत कार घटनास्थळाहून पसार झाले.
परिसरातील एका रिक्षाचालकाने भाग्यश्री आणि सुमितला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सुमितच्या हत्येची माहिती कळताच नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. सुमितचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.
या घटनेनंतर भाग्यश्री सुमित वाघमारे हिने आपला भाऊ बालाजी लांडगेच्या विरोधात बीड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.