‘होंडा’ कंपनी करणार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती; भारतातील कायम कर्मचाऱ्यांना मोठा फटका
भारतीय वाहननिर्मिती उद्योगाचा मोठ्या संकटांशी सामना, बऱ्याच काळापासून विक्रीत घट
नवी दिल्ली : दुचाकी वाहननिर्मिती क्षेत्रात भारतातील आघाडीची कंपनी असणाऱ्या होंडा मोटारसायकल्स अँड स्कुटर्स इंडियाने बुधवारी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. कोरोना संकटामुळे होंडा कंपनीच्या दुचाकी विक्रीत मोठी घट झाली आहे. परिणामी कंपनीला नाईलाजाने कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.
दुचाकी वाहननिर्मिती क्षेत्रात भारतातील आघाडीची कंपनी असणाऱ्या होंडा मोटारसायकल्स अँड स्कुटर्स इंडियाने बुधवारी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘होंडा’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून भारतीय वाहननिर्मिती उद्योग मोठ्या संकटांचा सामना करत आहे. बऱ्याच काळापासून विक्रीत घट होत आहे. अशातच कोरोनाच्या संकटामुळे आमची आर्थिक गणिते कोलमडल्याचे होंडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. होंडा मोटारसायकल्स अँड स्कुटर्स इंडियाने 5 जानेवारीला आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार कंपनीने कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. ज्यांनी 10 वर्षे कंपनीत काम केले आहे किंवा 31 जानेवारी 2021 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांचे वय 40 पेक्षा अधिक असेल, अशांसाठी ही योजना लागू असेल. सेवा कालावधीचा विचार करता वरिष्ठ प्रबंधक अथवा उपाध्यक्ष या पदावरील अधिकाऱ्यांना साधारण 72 लाख रुपयांची रक्कम मिळेल. तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या पहिल्या 400 जणांना अतिरिक्त पाच लाख रुपये मिळतील. भारतामधील होंडाच्या चार प्रकल्पांमध्ये सध्या 7000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.