हिंगोलीत राज्य राखीव दलाच्या जवानाची गफळास घेऊन आत्महत्या, आज सकाळी प्रकार उघडकीस
सुनील जाधव यांच्या आत्महत्येने राखीव दलात खळबळ अत्यंत मनमिळावू जवान म्हणून ओळख.
हिंगोली : हिंगोली येथील राज्य राखीव दलातील एका जवानाने त्यांच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २९) पहाटे उघडकीस आली. सुनील भिमराव जाधव (३५,बक्कल न.१०५४, रा. कोल्हापूर) असे या जवानाचे नांव असल्याचे राखीव दलाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
राखीव दलातील जवान सुनील भीमराव जाधव हे त्यांची पत्नी व लहान मुलासोबत राज्य राखीव दलाच्या वसाहतीमध्ये राहतात. आज पहाटे त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना सुनील यांचा मृतदेह हॉल मधील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. या प्रकाराची माहिती राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिस ठाण्यालाही देण्यात आली. दरम्यान, मयत जवान सुनील जाधव हे मुळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये सन २००६ मध्ये ते भरती झाले होते. आता पर्यंत त्यांनी नक्षलग्रस्त भागात तसेच देशातील विविध राज्यातील निवडणुकांमध्ये बंदोबस्त केला आहे. राखीव दलातील अत्यंत मनमिळावू जवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने राखीव दलात खळबळ उडाली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या संदर्भात राखीव दलाचे समादेशक संदीप गिल यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सुनील जाधव हे कर्तव्यनिष्ठ जवान होते. मात्र त्यांनी आत्महत्या का केली असावी हा प्रश्नच आहे. त्या संदर्भात चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.