राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस, आता परतीच्या वाटेवर
पुढच्या 2 ते 3 दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतून पाऊस परतण्यास सुरूवात
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने तुफान धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हा पाऊस आता परतीच्या वाटेवर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतून पाऊस परतण्यास सुरूवात होईल असे म्हटले आहे.
या वर्षी पावसाच्या परतीचा प्रवास हा थोडा लांबणीवर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली या भागांना मोठा तडाखा बसला होता, लाखो हेक्टरवरचं उभे पीक वाहून गेले. अनेक शेतांमधील तर जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. तर पावसाळा सुरू असताना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांनाही जोरदार तडाखा बसला. कमी दाबाचा पट्ट निर्माण झाल्याने राज्यात प्रचंड पाऊस कोसळला. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने नदी काठची अनेक गावे जलमय झाली होती. काही महिन्यांमध्ये पडणारा पाऊस हा काही तासांमध्ये पडल्याने सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडल्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या पावसालाच परतीला पाऊस म्हटल्या जात होते. मात्र हा परतीचा पाऊस नाही, असे हवामान खात्याने म्हटले. मात्र या पावसाच्या परतण्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हा परतणारा पाऊसही अनेकदा तडाखा देऊन जात असतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.