मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस

पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाणी विसर्ग

0

मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतील उपनगरात कुर्ला, चेंबूर, सायन, माटूंगा परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे दमदार पावसानंतर राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.
पुणे, नाशिक, जळगाव आणि सातारामधील धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू आहे. खडकवासला धरणातून सकाळी 5 हजार 136 क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांत 72.30 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. काल (13 ऑगस्ट) रात्री मुठा नदीत 16 हजार 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. खबरदारी म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय भिडे पूलाला लागून असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आली. मुठा नदी काठालगत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिकमधील दारणा धरणातून 9 हजार 900 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गेल्या 24 तासांपासून इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा धरण 92 टक्के भरले. यानंतर हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणाबरोबर भावली धरणदेखील भरल्याने भावलीतून 700 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरणातील पाणी साठ्यात 7 टक्क्यांनी वाढ झाली. गंगापूर धरण 66.92 टक्के भरले. निफाडमधील नांदूरमधमेश्वर धरणाच्या 5 वक्राकार गेटमधून गेल्या 16 तासांपासून 16 हजार 865 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात साडेसहा टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. धरणातील विसर्गही थांबला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 29 फूट 7 इंचांवर आली आहे. पंचांगगेचे पाणी पुन्हा पात्रात आले आहे. जालन्यामध्ये मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 64 पैकी 48 प्रकल्पांमध्ये 50.99 टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषतः मध्यम प्रकल्पात 63.64 टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. 16 प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा नाही. जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी भोकरदन तालुक्यातील जुई, धामना आणि जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. अंबड तालुक्यातील ग्लहाटी प्रकल्पात 84.39 टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 68.39 टक्के, जालना तालुक्यातील गिरजा प्रकल्पात 29.89 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील 57 मध्यम प्रकल्पांमध्ये 52.59 दलघमी म्हणजे 43.78 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

भुसावळ हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हतनूर धरणाचे दरवाजे उघडले. हातनूर धरणातून 75,125 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात 82.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पण सलग पाऊस सुरू आहे. धरणात 20694 क्यूसेकने पाणी आवक सुरू आहे. पाणी नियमनासाठी आज सकाळी 11 वाजता पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली. दरवाजे उघडणार नाहीत. पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग करणार आहेत. वसई विरारमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून वसई-विरार नालासोपाऱ्यात अधूनमधून उघडझाप करत पाऊस पडत आहे. मागच्या 24 तासांत वसई तालुक्यात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आजपर्यंत 1897 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणाची पाणी पातळी 67.76 मीटरवर गेली आहे. धरणात सध्या 63.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे ही वाढ झाली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.