सांगली-खानापूर तालुक्यांत आभाळ कोसळले, ‘अग्रणी’ला पूर
करंजे आणि बलवडीमधील पुलावरून दोन जण गेले वाहून
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये रविवारी पावसाने कहरच केला. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला. तसेच इतर तालुक्यांतही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. ‘अग्रणी’ नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोन जण वाहून गेले.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्यातील तासगाव, कडेगाव आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. इतर तालुक्यांही जोरदार पाऊस पडला. विशेष खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे त्याठिकाणी असणार्या नदी-नाले आणि अग्रणी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर आणि पुलांवर पाणी आले. तर खानापूर तालुक्यात ‘अग्रणी’ नदीला पूर आला असून झरे, बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे तर अन्य ओढ्यांनासुद्धा पूर आला आहे. तसेच विटा – कराड रोड वरील नांदणी व येरळा नदीवरील डायव्हर्शन केलेला कचे पूल नदीला आलेल्या पुराने वाहून गेले आहे. त्यामुळे विटा कराड रस्त्याची वाहतूक शिवणी मार्गे सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील नदी, नाले आणि ओढ्यांना सुध्दा पूर आला आहे,त्यामुळे या ठिकाणी असणारे छोटे बंधारे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. मौजे करंजे येथे अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे करंजे- तासगाव रोड वरील अग्रणी नदीवर असलेल्या पुलावरून सिराज मुलाणी (46 वर्षे ) हा व्यक्ती दुचाकीवरून पुलावरून जात असताना वाहून गेलेला आहे. तसेच बलवडी खा. येथे अग्रणी नदीवरील पुलावरून दुचाकीवरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेली आहे . या दोघांचेही शोध कार्य सुरू आहे. तसेच मौजे वाळूज येथे वीज पडून किरण महादेव देशमुखे यांच्या दोन म्हशी दगावल्या. दुपारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.