मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मुंबईत सुट्टी जाहीर – आयुक्त चहल

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन

0

मुंबई : मुंबईला मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबईत आतापर्यंत 150 ते 200 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यासंदर्भात मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी  माहिती दिली.

काल आणि आज दिवसभर पाऊस झाला. काल रात्री नऊ पासून आमचे काम सुरू  असून 254 वॉटरपंप सुरू आहेत. पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. अत्यावश्यक कर्मचारी सोडून कोणीही रस्त्यावर येऊ नये. जिथे पाणी तुंबते तिथे मी स्वत: पोहोचून आढावा घेत आहे”, अशी माहिती त्यांनी दिली .“काल रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबई कुलाबा ते माहीम येथे 80 ते 250 मि.मी. पावसाची नोंद केली आहे. सांताक्रूझमध्ये 180 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर ते वाशीमध्ये तितका पाऊस झालेला नाही. सर्वाधिक पाऊस कुलाबा, दक्षिण मुंबईत पाऊस झाला. जे अत्यावश्यक सेवेतील स्टाफ आहेत, आम्ही सर्व रस्त्यावर आहोत”, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक चाकरमानी हे अडकून पडले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.