परभणीत विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस, काही ठिकाणी बरसल्या गारा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याची वर्तवली होती शक्यता
परभणी : परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. तसेच, काही भागांत गाराही बरसल्या. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
बुधवारी (17 फेब्रुवारी) रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटांत पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त असून काही ठिकाणी गाराही बरसल्या. या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरभरा, अशा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा इशारा
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अस्मानी संकट असणार, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कालही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.
कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारीला मध्य-महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच, काही प्रमाणात गारपिटीची शक्यताही नाकारता येणार नाही. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.