‘कोरोनाची दुसरी लाट आल्यास महागात पडेल’, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजधानी दिल्ली आणि गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

0

मुंबई  : दिवाळीच्या सणासुदीच्या काळानंतर देशाची राजधानी दिल्ली आणि गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिला आहे.

राज्यात कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येता कामा नये. तथापि, दिवाळीच्या आधी राज्यात अनलॉकची प्रक्रिया आणखी पुढे गेल्यानंतर राज्यातील बहुतांश शहरात ग्राहकांनी कोरोना प्रतिबंधासाठी सरकारने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे चित्र आढळून आले आहे. यामुळे मनात काहीशी भीती आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी कोकण दौऱ्यात स्पष्ट केले. मुंबईत रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. तोंडावर मास्कचा वापर टाळणे आणि सुरक्षित सामाजिक वावराचे पालन न केल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये नवी सामाजिक आरोग्याची परिस्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे पुढच्या आठवड्यापासून शाळेचे काही वर्ग सुरू होत असताना, मुलां-मुलींची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावे. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे, अशी सूचनाही टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. तसेच कोणीही कोरोनाला गृहीत धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वयंशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.