‘शेतकऱ्यांना मदतीची गरज, प्रसंगी कर्ज घ्या’ मुख्यमंत्र्यांना करणार विनंती!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सर्वेसर्वा मराठवाडा दौऱ्यावर,पवारांकडून पीक नुकसानीची पाहणी

0

तुळजापूर : राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा भागातील झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर गेले. रविवारी सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेट देत, थेट शेताच्या बांधावर जात आणि वाहनांचा ताफा थांबवत बळाराजाशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

सोमवारी या पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडत अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसल्याची बाब स्पष्ट केली. आपल्या वक्तव्यातून आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहता, त्यांनी केंद्र आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.  ‘राज्यात अतिवृष्टीचे संकट कोसळले. पण, याची जबर किंमत शेतकऱ्याला मोजावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. यात तुलनेने काही जिल्ह्यांत अति नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर इथे बरेच नुकसान झाले आहे’, असे म्हणत आपण केलेल्या पाहणीमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्यां प्रमाणात नुकसान झाल्याचा मुद्दा पवारांनी पत्रकार परिषदेत मांडला. पेरलेले पीक होते ते  उद्ध्वस्त झाले, वाहून गेले; यंदा ऊसही होता मात्र पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारखानदारी सुरू करायला पाहिजे म्हणजे लोकांना दिलासा मिळेल, असा एक पर्याय त्यांनी पुढं ठेवला. पावसामुळे चिखल झाला आहे . त्यामुळे आहे तो ऊस तोडणी करता येत नाही. अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला, त्यामुळे जमिनी वाहिली, शेतकऱ्यांच्या जमिनीचे बांध फुटले, अशा शब्दांत अतिवृष्टीमुळे उभे राहिलेले विदारक चित्र पवारांनी सर्वांपुढे मांडत या रुपात राज्य सरकारवर मोठे आर्थिक संकट असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील मराठवाडा भागातच अतिवृष्टीमुळे झालेले संकट पाहता, कर्ज काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हा मुद्दा आधोरेखित करत प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे म्हणत पवारांनी आश्वस्त करणारे वक्तव्य केले. रविवारी पाहणी दौऱ्यादरम्यान, पवारांनी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी आपण केंदाकडे मदत मागणार असल्याचे आणि पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधला. पण, आपण या बाबतीत टोलवाटोलवी करत नसून आणि काहीही केंद्रावर ढकलत नसून मदतीसाठीही एक प्रक्रिया असते तिचे पालन करत आहोत, असे त्यांनी सांगितले. किल्लारी वेळी मदत करताना आम्ही जागतिक बँकेकडे गेलो होतो, पण या प्रक्रियेसाठी महिन्या- दीड महिन्याचा कालावधी लागला होता, असे म्हणत आपण पीकविमा निकष बदल करावे, अशी विनंती राज्य आणि केंद्र सरकारला करणार असून, शेतजमीन वाहून गेल्याने जमीन दुरुस्ती करावी लागणार, पाझर तालाव फुटले, रस्ते उखडले यासाठी डीपीडिसी निधी पुरणार नाही यासाठी राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची आग्रही भूमिका मांडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.