कोल्हापुरातून निवडून येणार होतात, मग मेधा कुलकर्णींना का डावलले?
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले
नाशिक : कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी दिले होेते.
मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुणे हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढवली होती. तत्कालीन भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन चंद्रकांतदादांना सीट देण्यात आली होती. हा विषय त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थिती होती. राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या 2 वर्षांत सर्व इमारती बांधा, अशी कोपरखळी छगन भुजबळांनी मारली. त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिले. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले “हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीने व्यासपीठावर हशा पिकला.
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे कुलकर्णींचे पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिले. विधान परिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचे जाहीर सांगितले होते, असे सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असे त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.