‘पोलिसांना विधानसभेत उलटे टांगू’; माजी मंत्री लोणीकरांची पोलिस अधिकाऱ्याला धमकी’

पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

0

जालना : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूरचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटे टांगू, अशी धमकी दिल्याचे या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. मात्र त्यांना छापेमारीत काहीच न आढळल्याने  संबंधित व्यापाऱ्याने घडलेली सर्व कैफियत भाजप नेते बबनराव लोणीकरांसमोर मांडली. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर पोलिस अधिकाऱ्यांशी बोलताना ऐकायला मिळत आहे. बबनराव लोणीकर यांनी  न्यायालयाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्यांच्या घरात घुसता कसे? असा सवाल  त्यांनी अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनंतरच धाड टाकली होती, पण त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर बबनराव लोणीकर संतापले आणि त्यांनी विधानसभेत तुम्हाला उलटं टांगील सगळ्यांना अशी धमकी दिली. व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपसंदर्भात भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सदर पोलिस अधिकाऱ्याने ज्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती, त्याची माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटले आहे, असे लोणीकरांनी वक्तव्य केले आहे. दरम्यान, याआधीही बबनराव लोणीकर यांनी एका महिला तहसीलदार अधिकाऱ्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी लोणीकरांच्या या ऑडिओ क्लिपविरोधात खेद व्यक्त केला आहे. तसेच एखाद्या पोलिस अधिकाऱ्याशी बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य एका माजी मंत्र्याने करणे हे निषेधार्य असल्याचे त्यांचे मत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.