गुप्तेश्वर पांडेंनी दिला चकवा, भाजपमध्ये प्रवेश नाही, राजकीय पक्ष ठरला!

बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्द सुरू

0

पाटणा : बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांच्या जनता दलात  प्रवेश करत आहेत. दुपारी एक वाजता हा प्रवेश होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी गुप्तेश्वर पांडे आग्रही होते. याशिवाय गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले होते.  ही सर्व पार्श्वभूमी पाहता गुप्तेश्वर पांडे हे राजकीय पक्षात प्रवेश करणार, असा दावा, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी केला होता. हा दावा आता खरा ठरला आहे. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस  घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती.गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. दरम्यान, नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरू शकतात. गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्‍या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला. गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.