साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित अभिवादन

सामान्यांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे

0

थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक, कथा कादंबरीकार तथा ख्यातनाम मराठी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन.. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी या लहान खेडेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते.

१ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते. तरीही त्यांनी ३५ कादंबऱ्या, १० कथासंग्रह, १२ पटकथा, १० पोवाडे आणि नाटकांसह विपुल साहित्य निर्माण केले. म्हणूनच त्यांना आपण साहित्यसम्राट संबोधतो. अण्णाभाऊंनी शिक्षण घेतल नाही. सामाजिक विषमतेमुळे शिक्षणाची कायमची गाठ सोडली. परंतु, प्रयत्न आणि जिद्द यांची सांगड घालून लिखाण कौशल्य व अक्षरज्ञान मिळविले. तत्कालीन काळात समाजात घडणाऱ्या अनेक अनिष्ट रुढी परंपरा, वाईट चालीरिती, समाजातील संघर्ष त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पहिला. तेव्हापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय होऊन सहभाग घेण्यास सुरुवात केली. गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत १९४४ मध्ये ‘लाल बावटा कला पथका’ची स्थापना केली. याद्वारे त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून अनेक सरकारी प्रश्नांवर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर उच्चवर्णीय भारतीय प्रशासनाच्या विरोधात वीस हजार लोकांचा मोर्चा काढत…” ये आजादी झुठी हैं, देश को जनता भुकी हैं” चा नारा देत आंदोलन उभे केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार मराठी राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्वतःला झोकून देऊन संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा दिली.

गिरणी कामगारांच्या समस्या लोकांपर्यंत पोहचून त्याविरुद्ध आवाज उठविला. कामगारांचे दुःख वेदना यांचा स्वतः अनुभव पाठीशी घेऊन प्रशासनाविरोधात दंंड थोपटले. ते म्हणत पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. यावरून सामान्य व्यक्तीबद्दलची कळकळ सर्वांना दिसून येत होती. मुंबईतील कोहिनूर मिलमध्ये काम करताना कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. अनेक मिरवणुका, सभा यात आपल्या शाहिरी आणि पोवाड्याने कामगारांना अन्यायाविरोधात बंड करण्यास तयार केले. संघर्ष आणि यश हे दोन्ही क्षण अण्णांनी अनुभवले, लहानवयात वाटेगाव ते मुंबई हा पायी केलेला प्रवास ते १९६३ मध्ये मुंबई ते रशिया हा विमानाने केलेला प्रवास. अण्णा भाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत आपल्या पोवाड्यातून सांगितले. पुढे त्याचे रशियन भाषेत रूपांतर झाले. सामाजिक आणि राजकीय कृतिशीलतेवर आधारित लेखन हा अण्णाभाऊंच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता. मुंबईच्या झोपडपट्टीत राहत असताना अण्णांनी एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती केली. त्यांना वाटे, आपण गलिच्छ वस्तीत राहत असलो तरी आपल मन मात्र एकदम स्वच्छ असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन उपेक्षितांना महत्व देऊन त्यांचा लढा अधिक संघर्षशील केला. ”जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भिमराव..”| या पंक्तीतून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. वंचित घटक, श्रमिक, दलित पददलित यांचा संघर्ष व त्यांचे प्रश्न सातत्याने आपल्या लेखणीत मांडत. साहित्यातील लोकवाड़.मय, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, कथा, नाट्य-लोकनाट्य, वग, गवळण, प्रवास वर्णन, असे सर्वच प्रकार सशक्त आणि समृद्ध करणारे. पोवाडे, गीत, शाहिरीच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेरक विचार रुजविले. मराठी भाषेत तब्बल ३५ कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिल्या आहेत. त्यातील “फकिरा” ला १९६१ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे. १५ पोवाडे, १३ कथासंग्रह, रशियातील भ्रमंती एक प्रवास वर्णन, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी, ७ चित्रपट कथा, अशी प्रंचड मोठी साहित्य कलाकृती ही अण्णाभाऊंच्या लेखणीचा आणि विचारांच समृद्धता दर्शविते. सामान्य व्यक्तीला अनुसरून असणार कादंबरीतील लिखाण, त्यातील पात्र, नैसर्गिक वर्णन हे अप्रतिम आणि वास्तववादी आहे. सामान्य वाचकांच्या मनाची व्यथा जाणणार अण्णांच लिखाण होत. त्यामुळेच त्यांच्या अनेक कादंबरीवर आधारित वारणेचा वाघ, फकिरा यासारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.

१८ जुलै १९६९ ला हलाखीच्या परिस्थितीत अण्णाभाऊंचे मुंबई येथे निधन झाले. आयुष्याच्या अवघ्या ४९ वर्षांंच्या कालावधीत अण्णाभाऊंनी सामाजिक आणि साहित्यिक क्रांती केली. स्वतः अथक परिश्रम, संघर्ष आणि गरिबीचे चटके सोसत इतरांच जगणं समृद्ध करणारी श्रीमंत साहित्य कलाकृती सर्वांना दिली. तीच जतन योग्यरीतीने करून सर्वसामान्यांना पर्यंत ती पोहोचली तरच अण्णाभाऊंनी खरी श्रद्धांजली ठरेल. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा पवित्र स्मृतिस विनम्र आदरांजली..|

लेखक : शरद गजले

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.