राज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती

राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू, खडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर?

0

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सदस्यांची यादी तयार केली आहे. त्यात भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आदिती नलवाडे आणि प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांची नावे चर्चेत असून राज्यपाल नियुक्त जागेवर विविध समाज घटकातील चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना राष्ट्रवादीने सामाजिक समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जे या चार जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनाही विधान परिषदेत पाठवण्याच्या राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. खडसेंना विधान परिषदेवर पाठवून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खेळी असल्याचे बोललं जात आहे. खडसे हे ओबीसी समाजातून आलेले आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि खडसे या दोन ओबीसी नेत्यांच्या साथीने ओबीसी मतांची बेगमी करण्यावर पवारांचा भर असणार आहे. त्याशिवाय खडसे यांचे उत्तर महाराष्ट्रातही प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी काळात खडसेंच्या साथीने सहकारी बँकांपासून ते पालिका आणि नगरपरिषदेतील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यावरही राष्ट्रवादीचा भर असणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. या शिवाय गेल्या टर्ममध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यात यश मिळविले होते. आता धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आले आहेत. शिवाय राष्ट्रवादी सत्तेत आहे. विधान परिषदेत भाजपने प्रवीण दरेकरांच्या रुपाने अभ्यासू विरोधी पक्षनेता दिला आहे. खडसेंना विधान परिषदेत आणल्यास विरोधी पक्षाला नामोहरम करण्यास फायदाच होणार असल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं राष्ट्रवादीत घटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘वंचित’चा धसका, शिंदेंना लॉटरी?

महाराष्ट्रात आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून  त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ते दलित समाजातून आले आहेत. विशेषत: ते रिपब्लिकन चळवळीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन दलितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मोठी राजकीय शक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे ‘वंचित’ची ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल, असे बोललं जात आहे. आदिती नलावडे या राष्ट्रवादीच्या मुंबईच्या संघटक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन मुंबईत राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचं मुंबईतील संघटन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आदिती नलावडेंना उमेदवारी देऊन मुंबईत राष्ट्रवादीचे बस्तान बसवण्याचाही या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याचं बोलले जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.