धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात गोरखधंदा! भगवानबाबा आश्रमशाळेत…

बोगस आधार नंबर दाखवून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत लाखोंचा अपहार

0

बीड :   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांच्या बीड जिल्ह्यात आश्रम शाळाचे बोगस विदयार्थी रॅकेट शिक्षकांनी उघड केले आहे. काल्पनिक विद्यार्थी आणि बोगस आधार नंबर दाखवून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत लाखो रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली.आश्रम शाळेत 237 विदयार्थी हे ‘काल्पनिक’ असल्याचे वास्तव समोर आले आहे. या संदर्भात बीडचे सहायक समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांच्याशी संपर्क साधला असता, पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. फोनवर संपर्क करतो, असे त्यांनी सांगितले.

पाटोदा तालुक्यातील वडझरी गावात बहुतांश डोंगर पट्ट्यातील ऊसतोडणी मजूर वास्तव्य करतात. यातच इतर भटक्या जमातीचा मुलांना शिक्षण मिळावे व निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या विजभज निवासी आश्रम शाळेमध्ये काल्पनिक विदयार्थी दाखवून शासनाच्या योजनेचा लाभ घेतला गेल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात इतर 45 आश्रम शाळा आहेत. या सर्वांची चौकशी केली जावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने सुरू केल्या निवासी आश्रमशाळेतील वास्तव समोर आले आहे. यात शालेय पोषण आहार काळाबाजार, पुस्तक व शैक्षणिक साहित्य, रद्दीची परस्पर विक्री केली जात असल्याचे शिक्षक सांगत आहेत. वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील गेल्या सतरा वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करणाऱ्या धनंजय सानप यांना कोरोना महामारीत गेल्या आठ महिन्यांपासून पगार दिला नाही. याचे कारण त्यांना विचारला असता, शाळेमध्ये बोगस विद्यार्थी दाखवण्यास व खोटे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे संस्था चालकांकडून व मुख्याध्यापकांकडून खोट्या नोटीस पाठवून निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे या शाळेतील शिक्षक धनंजय सानप यांनी सांगितले. तसेच 237 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी सजीव सृष्टीवर दाखवून द्या, म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे देखील सानप यांनी सांगितले. संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेत काम करणाऱ्या संजय जायभाय या शिक्षकाची व्यथा देखील अशीच आहे. कोरोनाच्या काळात शाळा सुरू नसल्याने संस्था चालकांनी थेट बांधकामावर पाणी मारण्यासाठी पाठवले. तसेच प्रत्येक वर्षी संस्थाचालक दोन पगार मागून घेतो. नाही दिले तर वर्षभराची पगार काढत नाही. तसेच निलंबित करण्याची व काढून टाकण्याची धमकी देतो. यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या शिक्षक संजय जायभाय यांनी केली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून काम करणाऱ्या दीपक बांगर यांच्यासमोर आज दिवाळी साजरी करायची कशी? हा प्रश्न पडला आहे. संकटात अगोदरच आर्थिकस्थिती ढासळली असताना गेल्या आठ महिन्यांपासून संस्थाचालकांनी पगार दिला नाही. त्यामुळे दसरा गेला दिवाळीसाठी माझ्या लहान मुलांना कपडे आणू कसे? असे सांगताना दीपक बांगर यांच्या डोळ्यात पाणी आले. संस्थाचालक मुख्याध्यापक वर्षातील दोन पगारांची मागणी करतात. पगार नाही दिला तर आमचे वर्षभराची पगार अडकून धरतात. यामुळे अतोनात छळ सुरू आहे. तरी माननीय पालकमंत्री महोदयांनी व मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. खोटे काम करण्यास नकार दिल्याने ही वेळ आमच्यावर आली असल्याची कबुली या शिक्षकांनी दिली. शाळेमधील बिंदु नामावली वारंवार बदलणे, काल्पनिक विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा काळाबाजार विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके यांची रद्दी त्याचबरोबर शिक्षकांनी कर्मचाऱ्यावर जुलूम जबरदस्ती करत घरगुती काम करून घेत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा अधिकारी समाज कल्याण आयुक्त यांनी देखील या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र राजकीय दबाब असल्याने हे ही संस्था भ्रष्टाचाराचे कुरण झाले, असल्याचे उघडकीस आले आहे आतातरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशा बोगस संस्थांवर कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.