गोमाता म्हणता, गोव्यात जाऊन तेच खाता, हे कसले हिंदुत्ववादी?; भुजबळांचा घणाघात

हिंदुत्व व राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

0

नाशिक : हिंदुत्व आणि राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी भाजपच्या आध्यात्मिक सेलने मंदिरे उघडण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरही टीका केली. मंदिरे खुली केली नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची आहे. केवळ भाजपच सत्तेत राहू शकते का? इतरांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही का?, असा सवाल करतानाच अनेक राज्यांमध्ये अजूनही मंदिरे उघडण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे, असे सांगतानाच सर्व उपाययोजना करूनच राज्यातील मंदिरे खुली केली जाणार असल्याचे संकेतही भुजबळ यांनी  दिले. भुजबळ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरले. हे कसले हिंदुत्ववादी आहेत. इथे गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता. हेच का तुमचे हिंदुत्व, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, कालपासून भाजपच्या अध्यात्मिक सेलच्यावतीने तुळजापूरमध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू केलं होते. त्यामुळे या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय मंदिर परिसरात 300 मीटरपर्यंत कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे आध्यात्मिक सेलनेही आज निदर्शने करून आजचे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, पुढील काळात मंदिरे न उघडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील, असे वाटत नाही, असे सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.