‘देव करतो ते भल्यासाठीच करतो…’, ऐका धनंजय मुंडेंच्या तोंडून खास गोष्ट

गावाकडच्या गोष्टी सांगून, काही किस्से रंगवून ठसकेबाज भाषण करण्याचा धनंजय मुंडे यांचा पिंड...

0

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे भाषण करण्यात तरबेज… गावाकडच्या गोष्टी सांगून, काही किस्से रंगवून ठसकेबाज भाषण करण्याचा धनंजय मुंडे यांचा पिंड…
असेच भाषण त्यांनी काल बीडच्या परळीमध्ये ठोकले. सद्यपरिस्थितीला अनुसरुन एका राजाची गोष्ट सांगून त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. देव करतो ते भल्यासाठीच करतो… अशी ती गोष्ट….!

धनंजय मुंडे यांनी सांगितलेली गोष्ट काय?

“एक राजा असतो. दरबारात बसल्या बसल्या त्याचे तलवार पुसायचे काम सुरू असते. यावेळी त्याचे थोडे लक्ष विचलित होते… धारदार तलवारीने त्याच्या एका हाताचा अंगठा तुटतो. तितक्यात शेजारी उभा असलेला प्रधान म्हणतो, “राजे देव करतो भल्यासाठीच”… राजाला राग येतो…. राजा आदेश देतो… या प्रधानाला काळ्या कोठडीत डांबा… प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा होते….” “बऱ्याच दिवसांनंतर राजाला हुकी येते की, आपण शिकारीला जाऊ… राजा शिकारीला निघतो. सोबतीला सेनापती… आणखी थोडी फौज… दाट जंगलात राजा जातो… फौज मागे पडते… तेथील आदिमानव राजाला पकडतात. ते त्या राजाला त्यांच्या राजाकडे घेऊन जातात… त्यावेळी तिथे नरबळीची प्रक्रिया सुरू असते. नेमके त्याचवेळी त्यांना नरबळी हवा होता… आदिमानवांनी त्यांच्या राजाला सांगितले, आम्ही नरबळी आणलाय.. प्रथेप्रमाणे राजाला अंघोळ घातली गेली. पण अंघोळ घालत असताना एका वृद्ध आदिमानवाच्या लक्षात येते ‘याला तर अंगठा नाही’… असा नरबळी नको… ते पाहिल्यानंतर संबंधित राजा त्या राजाला सोडून देतो… “सुटका झालेला राजा पळत पळत आपल्या राजवाड्यात येतो… आपल्या सैनिकांना आदेश देतो… प्रधानाला सोडा… प्रधानाला सोडले जाते…. राजा आपल्या प्रधानाला त्याला मिठी मारतो.. जंगलातील सगळा प्रकार राजा आपल्या प्रधानाला सांगतो… त्यावेळी प्रधान पुन्हा एकदा म्हणतो, राजे मी म्हटले होते ना तुम्हाला देव करतो तो सगळं भल्यासाठी करतो… पण राजे तुम्ही मला जेलमध्ये टाकले.. ते सुद्धा बरंच केले.. जर तुम्ही मला जेलमध्ये टाकले नसते तर मी तुमच्यासोबत जंगलामध्ये आलो असतो… मी सावलीसारखा तुमच्यासोबत असतो… नरबळीवेळी तुमचा अंगठा तुटला म्हणून त्यांनी तुम्हाला सोडले असते, पण मला धरले असते. म्हणून संजय भाऊ देव करतो तो भल्यासाठीच करतो….

पंकजा मुंडेंवर निशाणा

परळीतील एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय वारसा कुणाला मिळावा? यावर बहीण पंकजा मुंडे यांचे नाव घेता पुन्हा तोफ डागली. माझ्या आजीने लहानपणी मला ही गोष्ट सांगितली… असे सांगत मुंडे यांनी राजाची गोष्ट सांगून उपस्थितांकडून दाद मिळवून घेतली.

संधी मिळेल तेव्हा भावंडांचा एकमेकांवर निशाणा

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद या महाराष्ट्राला काही नवीन नाही. 2014 च्या निवडणुकीत बहीण पंकजा यांच्याकडून पराभव पत्करलेल्या धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बहिणीचा दारुण पराभव केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारस कोण ठरावा, यासाठी यांच्यात सतत खटके उडाले… संधी मिळेल तेव्हा हे दोघेही भावंडे एकमेकांवर राजकीय जीवनात भाष्य करताना दिसतात. कधी पंकजा यांच्याकडून चिमटे तर कधी धनंजय यांच्याकडून समाचार घेतला जातो. दोघांच्याही फटकेबाजीवरुन राजकारण सतत तापले जाते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.