संसद आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण द्या; शिवसेनेची मागणी

राज्यसभेत महिला दिनानिमित्त विशेष चर्चेचे करण्यात आले आयोजन

0

नवी दिल्ली :  शिवसेनेने महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ही मागणी केली आहे. राज्यसभेत महिला दिनानिमित्त विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत ही मागणी केली. 24 वर्षांपूर्वी आम्ही महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, आता महिलांची लोकसंख्या 50 टक्के झाली आहे. त्यामुळे महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्यात यावे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. कोविडच्या काळात त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर झाला आहे. त्यामुळे संसदेत या सर्व विषयांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस असावा

भाजपच्या खासदार सोनल मानसिंह यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. तसा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसही साजरा केला जावा, अशी मागणी केली. यावेळी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानांना उजाळा देणारा हा आजचा दिवस आहे. तसेच महिलांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचाही हा दिवस आहे, असं नायडू म्हणाले. यावेळी सरोज पांडे आणि फौजिया खान यांनीही महिलांच्या समस्यांवर राज्यसभेचं लक्ष वेधले.

महिला इतिहास घडवण्यास सक्षम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. महिला इतिहास आणि भविष्य घडविण्यात सक्षम असल्याचं त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. महिला इतिहास घडवू शकतात. कोणाला हे रोखण्याची परवानगी देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी इंधन दरवाढीवर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी केली. शून्यप्रहारात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. काँग्रेस सदस्यांच्या गदारोळामुळे अखेर सभागृहाचे कामकाज 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.