गणेश नाईकांचे इंटरनॅशनल डॉनशी संबंध?; एसआयटी चौकशी करा : सुप्रिया सुळे

महापालिकेतील गणेश नाईक यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडीने कसली कंबर

0

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील गणेश नाईक यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे मेळावा घेऊन नाईकांवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. ‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’, अशी मागणी करतानाच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले.

सुप्रिया यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होतील, अशी शक्यता असताना राजकारण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात उतरली आहे. नाईक यांचे अनेक शिलेदार शिवसेना आणि राष्ट्रवादीला जाऊन मिळाले आहेत. फोडाफोडीमुळे तणावही वाढत चालला आहे. त्यातच गणेश नाईक यांनी एका जाहीर भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादीला अत्यंत सूचक शब्दांत धमकी दिली आहे. ‘कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री-अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही’, असे विधान गणेश नाईक यांनी तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याचा सुप्रिया सुळे यांनी आज समाचार घेतला. त्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

‘भाजप आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या आमदाराने केलेले विधान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना मी पत्र लिहिणार आहे. याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांचा ‘पारदर्शकपणे’ हा लाडका शब्द आहे. त्यानुसार यात पारदर्शकपणे नक्की काय आहे, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळायला हवे. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. एप्रिलमध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही यावेळी सुप्रिया यांनी नमूद केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.