माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा जाधवांचा दावा

0

पुणे  : ज्येष्ठ दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

याप्रकरणी अमन चढ्ढा (२८, रा. बापोडी, पुणे) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादीचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंधवरून जात होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जाधव यांच्या कारचा दरवाजा अचानक उघडला आणि चढ्ढा दांपत्य दरवाजाच्या धक्क्याने खाली पडले. त्यानंतर जाधव यांनी दांपत्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. या प्रकरणात ईशा बालाकांत झा यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्यांना अटक करायची असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यानुसार जाधव यांना पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई : जाधव 

राजकीय हेतूने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार द्यायला गेलो असता पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही, असा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात केला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा हात

जाधव सहकारी महिलेसह औंध येथून कारने जात असताना दुचाकी आडवी लावण्यात आली. अमन चढ्ढा, करण चढ्ढा, काँग्रेसचे नगरसेवक मनीष आनंद यांनी जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला दुसऱ्या गाडीत बसवले. कारमध्ये सहकारी महिलेचा विनयभंग केला तसेच जाधव यांना मारहाण केली. यानंतर जाधव हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. राजकीय दडपण आणून जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचे सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हात आहे. – अॅड. जहीर पठाण (बचाव पक्षाचे वकील)

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.