इंग्लंडच्या माजी वेगवान गोलंदाज जोई बेंजामिनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इंग्लंडचे माजी गोलंदाज जोई बेंजामिन यांचे वयाच्या 60 व्या वर्षी झाले निधन
लंडन : भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी वाईट बातमी आहे. 1990 मध्ये इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावणारे माजी खेळाडू जोई बेंजामिन यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आहे.
बेंजामिन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. बेंजामिन यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वाचे तसेच इंग्लंडच्या युवा खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे.
क्रिकेट कारकिर्द
बेंजामिन यांचा जन्म 1961 मध्ये सेंट किट्स येथे झाला होता. वयाच्या 15 वर्षी ते आपल्या कुटुंबासोबत ब्रिटेनला स्थायिक झाले. येथूनच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. येथे त्यांनी वार्विकशर काउंटीसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यासह त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. बेंजामिन यांनी वयाच्या 33 वर्षी 1994 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. याच वर्षी त्यांनी वनडे डेब्यु केले होते. बेंजामिन यांची क्रिकेट कारकिर्द फार मोठी राहिली नाही. मात्र त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली.
कसोटी पदार्पण
बेंजामिन यांना वयाच्या 27 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 1988 मध्ये वार्विकशरकडून त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटला सुरुवात केली. पण यामध्ये ते फार यशस्वी ठरले नाही. यानंतर 4 वर्षांनी 1992 मध्ये ते सरेकडून खेळू लागले. हा संघबदल त्यांच्या क्रिकेटमधील टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे त्यांना इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. वयाच्या 33 वर्षी 1994 मध्ये त्यांनी कसोटी पदार्पण केले. लंडनच्या द ओव्हलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 4 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र यानंतर त्यांना कसोटीमध्ये फार संधी मिळाली नाही. तर याच वर्षी त्यांचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे पदार्पण झाले. यामध्ये त्यांनी 2 सामन्यांत 1 विकेट घेतली. त्यानंतर त्यांना संघातून डच्चू मिळाला.
एका वर्षात 80 विकेट्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेंजामिन फार यशस्वी ठरले नाही. मात्र त्यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला. 1992 मध्ये सरेत आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गी सीजनमध्ये 64 विकेट्स पटकावल्या. तर पुढील हंगामात गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवले. 1994 च्या मोसमात त्यांनी 20.7 च्या सरासरीने 80 विकेट्स घेतल्या. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 560 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिज
दरम्यान 12 मार्चपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील सर्व सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ वरचढ ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.