पद्मसिंहांच्या नातवाकडून पार्थ पवारांची पाठराखण
मी लहानपणापासून पाहतोय, तुम्ही जन्मजात लढवय्ये - मल्हार पाटील
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील राजकारणात पवार घराण्याचे विशेष महत्त्व आहे. याच कुटुंबातील वादामुळे राजकारण ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत बुधवारी फटकारले. यानंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले.
विरोधीपक्षाकडून पार्थ पवारांना समर्थन देत या वादात तेल ओतण्याचं काम सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांचे समर्थन केले आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, हे मी लहानपणापासून पाहत आलो, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत पार्थ पवारांना पाठिंबा दर्शवला. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि लढा कसा द्यायचा हे आपल्याला माहीत आहे’ असे ते म्हणाले.