मुंबई काँग्रेसकडून गटातटांची खुशामत, कार्यकारिणीत 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव
मुंबई महापालिका निवडणुकांना काँग्रेस स्वबळावर सामोरे जाणार
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव अशा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता या निमित्ताने घेतली गेल्याचे चित्र आहे.
सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव आणि 30 कार्यकारी सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांना काँग्रेस स्वबळावर सामोरी जाणार आहे. त्यामुळे सामूहिक नेतृत्व सोपवत सर्व गटांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहे. याआधी राज्य पातळीवरही हा प्रयोग करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरातांनंतर नाना पटोलेंकडे खांदेपालट झाल्यानंतर विभागनिहाय पदांचे वाटप महाराष्ट्र काँग्रेसमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई काँग्रेस कार्यकारिणीत कोण कोण?
ज्येष्ठ उपाध्यक्ष : मधू चव्हाण, बाबा सिद्दीकी, वीरेंद्र बक्षी, जेनेट डिसुझा, गणेश यादवी, शिवजी सिंह.
उपाध्यक्ष :अशोक सुतराळे, नगमा मोरारजी, युसुफ अब्राहनी, दिनेश हेगडे, जॉर्ज अब्राहम
मोहम्मद शरीफ खान, जयप्रकाश सिंह, मोहसीन हैदर, वीरेंद्र उपाध्याय, धर्मेश व्यास, अर्जुन सिंह, गोविंद सिंह, जुनैद पटेल, प्रवीण नाईक, प्रणिल नायर.
गेल्या वर्षी 19 डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची दिल्लीतून घोषणा झाली होती.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
शिवसेना – 97, भाजप – 83, काँग्रेस – 29, राष्ट्रवादी – 8, समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1, एमआयएम – 1, अभासे – 1.
काँग्रेस-शिवसेनेचे महापालिकेत जमेना
काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काहीअंशी शिवसेनेबद्दल नाराजीही आहे. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी रवी राजा यांनी याआधीही बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीसह इतर समिती निवडणुकात काँग्रेस सत्ताधारी सेनेविरोधात मैदानातही उतरली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.
भाई जगताप यांना मुंबई अध्यक्षपदाची धुरा का?
मुंबई पालिका निवडणूक : मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला आळा घालत पक्षात नवा उत्साह आणण्यासाठी भाई जगताप यांची निवड झाली आहे. भाई जगताप हे वादापासून दूर आणि सर्वांशी चांगले संबंध असलेले नेते आहेत. त्यामुळे याचा काँग्रेसला बीएमसी निवडणुकीत उपयोग होईल, असाही अंदाज बांधला जात आहे.
मराठमोळा चेहरा : मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर संजय निरुपम यांच्या नियुक्तीवरुन काँग्रेसवर कायमच अमराठी नेत्याची नियुक्ती केली म्हणून टीका होत राहिली. मात्र, आता तोंडावर बीएमसी निवडणुका असल्याने काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. त्यातच भाजपनेही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यामुळे आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर झाल्यास काँग्रेसला याचा फायदा होऊ शकणार आहे.
एकदम नवे नाव : याआधी वर्षानुवर्षे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कधी मिलिंद देवरा, कधी गुरुदास कामत, तर कधी एकनाथ गायकवाड यांचीच आलटून पालटून निवड होत आली. त्यामुळे या सर्वांविषयी एक प्रकारची पक्षांतर्गत नाराजीही कार्यकर्त्यांमध्ये होती. या सर्वांचे आपले स्वतंत्र गटही होते. त्यामुळे या गटबाजीचा फटका काँग्रेसला अनेक ठिकाणी बसल्याचेही पाहायला मिळाले
शिवसेनेशी जवळीक राहील : कामगार युनियनचे नेते राहिलेल्या भाई जगताप यांची निवड मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर केल्याने काँग्रेसला शिवसेनेशी जवळीक ठेवता येणार आहे. भाई जगताप शिवसेनेशी संवाद ठेवण्यात आणि पक्षाला उपयोगी निर्णय घेण्यात उपयोगी ठरतील, असाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार असल्याचं सांगितले जाते.
. कोणत्याच वादात नाही : भाई जगताप हे वादांपासून दूर असलेले काँग्रेस नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसला नवी ओळख मिळेल. त्यांच्या या वादापासून दूर राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारुन आगामी बीएमसी निवडणुकीत कामगिरी सुधारता येईल, असाही विचार काँग्रेस नेत्यांनी केलेला दिसतो.