अखेर अविनाश जाधव यांची सुटका!, म्हणाले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही!

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर

0

ठाणे : मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून त्यांनी जनतेसाठी आंदोलन केले असल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहिती न्यायालयात जाधव यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी तुरुंगातून सुटल्यावर दिली.
अविनाश जाधव यांच्यावर नौपाडा आणि कापूरबावडी, अशा दोन पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. महापालिका मुख्यालयासमोर नर्सेससाठी आंदोलन केल्याने हे गुन्हे दाखल केले गेले होते. त्यातील एक कलम हे सरकारी कामात अडथळा आणण्याचे होते. त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पहिल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर तुरुंग कोठडी सुनावली होती. 6 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी अतिवृष्टीमुळे कागदपत्र तयार नसल्याचे सांगितल्याने सुनावणी आजवर गेली होती. अखेर सात दिवसांनंतर आज त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांची बाजू मांडत, जाधव यांच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे सांगितले. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांच्यात युक्तिवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांवर युक्तिवाद करण्यात आला. जाधव यांना जमीन दिल्यास पुन्हा, अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी ‘कोविड’च्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केले होते.त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती पुढेदेखील अशीच लढाई जनतेसाठी सुरू राहील, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.