अहमदनगर : अहमदनगरमध्ये वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर सुरू होताच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांवर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात एका विद्यार्थिनी आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा कॉस्ट अँड वर्क अकाऊंटचा शुक्रवारी पेपर आयोजित केला होता. सकाळी या परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली. हा पेपरचे वाटप करण्यात आल्यानतंर लगेचच तो एका विद्यार्थिनीने व्हाट्सॲपवर शेअर केला. या प्रकरणात एका विद्यार्थिनीचा आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच आणखी काही विद्यार्थी सहभागी असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बुम्हाणनगर येथील बाणेर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मच्छिंद्र जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तपासासाठी पथके रवाना केली आहे.