फिल्मी स्टाईलने पाठलाग, सोनसाखळी चोरास शिताफीने अटक
नाशिकच्या गुन्हे शाखेचे गुलाबराव सोनार पती -पत्नीचे या कारवाईमुळे कौतुक
नाशिक : एकीकडे ड्युटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या नागपूर पोलिस दलातील 15 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले, मात्र नाशिकमध्ये रजेवर असतानाही कर्तव्याला प्राधान्य देत पोलिस नाईक गुलाब सोनार यांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या. या कामात गुलाब सोनार यांची पत्नी मदतीला धावून आली. या पती-पत्नी दोघांच्या प्रयत्नाने अट्टल चोराला पकडण्यात यश आले.
गुलाब सोनार हे नाशिकच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. 15 दिवस सुट्टीवर असणारे गुलाब सोनार दोन दिवसांपूर्वी पुण्याहून नाशिकला येत असताना त्यांना संगमनेरजवळ दोन दुचाकीस्वार नाशिकच्या दिशेने येताना दिसले. संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. रविवारी नाशिकला तीन चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील फरार आरोपीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटो मॅच करुन बघितले. खात्री पटल्यावर नागरिकांच्या मदतीने सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र नागरिकांची साथ मिळाली नाही. अखेर पत्नी आणि गाडीत असणाऱ्या एका नातेवाईकाच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांनी शिताफीने दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी मोटरसायकलसह चार-पाच सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या.