लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा, अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शय्यासुखाची मागणी

नियुक्ती आदेश काढण्यासाठी आधी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा वाढला निर्लज्जपणा आणि त्याने चक्क शय्यासुखाची केली मागणी

0

लातूर :अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नियुक्ती आदेश काढण्यासाठी आधी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा वाढला आणि त्याने चक्क शय्यासुखाची मागणी केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

2007 पासून पीडितेच्या अर्ज-विनंत्या 

लातूर शहरातील एका शिक्षण संस्थेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, नियुक्ती पत्र देण्यात यावे, या मागणीसाठी पीडिता आणि तिची आई 2007 पासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अर्ज-विनंत्या करत आहेत. नियुक्ती आदेश काढण्यासाठी सुरुवातीला पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याने अखेर निर्लज्जपणा दाखवला. पैसे नसतील, तर शरीर दे, त्यानंतर ऑर्डर काढतो, असे वक्तव्य अधिकाऱ्याने केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

संबंधित खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या पीडितेच्या वडिलांचे 2007 मध्ये निधन झाले. त्यानंतर पीडितेच्या आईने शिपाईपदावर नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. दरम्यानच्या कालावधीत पीडितेने शिक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अनुकंपा तत्त्वावर आपणाला विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले.

अधिकाऱ्याने आरोप फेटाळले

2017 पासून पीडिता नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्याशी आम्ही संपर्क केला असता, त्यांनी पीडितेच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, लातुरातील प्रकरणात नवा ट्विस्ट

लातूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करणाऱ्या पीडितेवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी तक्रारदार महिलेविरोधात लातूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर संबंधित महिला कार्यालयात येऊन नेहमी गोंधळ करत असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलेला आता जिल्हा परिषदेने नोकरी देण्याचा नियुक्ती आदेश दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.