…शेतकरीही भारताचे नागरिक, केंद्राच्या मदतीत नको दुजाभाव : विश्वजित कदम
त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे आवाहन
सांगली : केंद्र सरकरने महाराष्ट्राला मदत करताना भेदभाव करू नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राने पथक पाठवावे. महाराष्ट्रातील शेतकरी ही भारताचे नागरिक आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी ही भारताचे नागरिक आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करण्याऐवजी, केंद्राने बिहारला मदत देताना, बिहार सरकारकडून प्रस्ताव मिळला होता का हे सांगावे, असा सवाल विश्वजित कदम यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी खोटे आरोप करण्याऐवजी, समोरामोर येऊन बोलावे, असे आव्हान कदम यांनी दिले. महाराष्ट्रात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे केल्यानुसार महाराष्ट्रातील 35 लाख हेक्टर शेती बाधित झाली असून यामध्ये आणखी 15 ते 20 लाख हेक्टरची वाढ होऊ शकेल, असे कदम यांनी म्हटले. राज्यात 45 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असावे, असा आमचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वाधिक मदत करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात दर हेक्टरी 8 हजार रुपये देण्यात आले होते. आम्ही शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असल्याचे कदम यांनी सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे याचे भान ठेवून वागावे, असा सल्ला विश्वजित कदम यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीला सल्ला दिला आहे.