प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, शोध सुरू
गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता असल्याची माहिती
पुणे : पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे बेपत्ता आहेत. 64 वर्षीय गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी इथून बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.
गौतम पाषाणकर हे ‘पाषाणकर आटोमोबाईल्स’चे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कोणत्या नातेवाइकांकडे गेले आहेत का? त्यांनी कोणाशी संपर्क केला होता, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळच्या मोदी बागेमध्ये राहतात. पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळी लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे कार्यालय गाठले. यानंतर काही वेळाने पाषाणकर यांनी कारचालकाला पानशेतला एका कामानिमित्त पाठवले होते आणि ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. पण त्यानंतर ते बेपत्ता झाले, अशी माहिती देण्यात आली आहेत. पाषाणकर यांच्या कारचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाषाणकर यांना फोन केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे चालकाने याची माहिती त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याला दिली. यानंतर कुटुंबाने शोध सुरू केला असता, कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.