महापालिका, ग्रामपंचायतीच्या लढाईआधीच ‘मविआ’त ‘स्वबळाचे’ वारे?

महाविकास आघाडीचे ठरले ! भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !

0

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरू करण्यात आली आहे. गावागावांत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचेच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर 618 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असे चित्र पाहायला मिळाले तर अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित मानले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

वैजापूर – 135
पैठण – 108
फुलंब्री – 71
खुलताबाद – 39
सोयगाव – 46
कन्नड – 138
औरंगाबाद – 114
सिल्लोड – 102
गंगापूर – 111

ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार खर्चाची मर्यादा

– ७ ते ९ सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीत २५ हजारांची खर्च मर्यादा

– ११ ते १३ सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीत ३५ हजारांची खर्च मर्यादा

– १५ ते १७ सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीत ५० हजारांची खर्च मर्यादा

– उमेदवारांच्या प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार

सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर!

राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यांत निवडणुकीआधीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले होते, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुने आरक्षण रद्द केले आहे.

….का घेतला असा निर्णय?

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

‘मनसे’ही ग्रामपंचायतीच्या रिंगणात!

राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘मनसे’चा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.