विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक; मतदान किती टक्के?

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक

0

औरंगाबाद  :  विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान झाले. औरंगाबाद विभाग, पुणे आणि नागपूर, अशा पदवीधरच्या तीन आणि अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी आज मतदान झाले. निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होतील.

कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. महाविकास आघाडीचा भाजपशी थेट सामना होणार असल्याने या निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचे आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावे लागणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात सुमारे 61 टक्के मतदान झाले. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के तर शिक्षकसाठी 67.36 टक्के मतदान झाले. नागपूर पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाले. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.

शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकात संध्याकाळी पाच पर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 99.31 टक्के मतदान झाले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान पार पडले. आठही जिल्ह्यांमध्ये यंदा एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदानाचा हक्क बजावला. 813 मतदार केंद्रांवर निवडणूक पार पडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.