निवडणूक आयोग : भाजपचे तक्रारदार सरसावले खरे, पण सारे काही होणार व्यर्थ
सोमैया यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे
मुंबई : निवडणूक आयोगाकडे किरीट सोमैया यांनी थेट तक्रारच केली. त्यामुळे सोमैया यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. किरीट सोमैया यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्त्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
किरीट सोमैया यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्त्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी दुसरे लग्न केल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी कबुल केले आहे. याशिवाय त्यांची दुसरी पत्नी असलेल्या रेणू शर्मा मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे, असे किरीट सोमैया यांनी पत्रात नमुद केले आहे. तर या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. राजकारणात आयुष्य उभे करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे हे योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता येत नाही. दि्वभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते.