एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, प्रवेशाचा ठरला मुहूर्त; त्याचे करणार सोने?

घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यावर राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित

0

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली. त्यानुसार एकनाथ खडसे येत्या गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्ल्याचे समजते. यापूर्वी एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा अंदाज फोल ठरला. यानंतर खडसे यांनी ‘प्रसार माध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, असे म्हटले होते. तसेच मी अजून भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र,  पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच राज्यपालांकडे त्यांच्या नावाची शिफारस केली जाईल, अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होईल. तसेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडी सरकारमध्ये काय जबाबदारी द्यायची, यावरही खल सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना कृषीमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.